विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांना 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा
मुंबई । वीरभूमी- 31-Dec, 2021, 12:52 AM
वाढता कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचा धोका विचारात घेवून राज्य सरकारने राज्यातील निर्बंध वाढविण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढल्यानंतर आज मध्यरात्री (30 डिसेंबर रोजी) नवीन आदेश काढून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
राज्यात ओमायक्रॉन व कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री व संबधित मंत्री यांनी टास्क फोर्सबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.
याबाबत गुरुवारी मध्यरात्रीपासून गर्दी आटोक्यात आणण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मीक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम अशा सोहळ्यांना 50 लोकांची उपस्थित तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पर्यटनस्थळावर जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना बाधितांची संख्या विचारात घेऊन राज्यात लवकरच कडक निर्बंध लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने समारंभाच्या उपस्थितीती बाबत निर्बंध जाहीर करण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांवर कलम 144 नुसार कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे.
Comments