‘संयमाची परीक्षा’
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर राजकीय गदारोळ । काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याची उत्सुकता
महादेव दळे । वीरभूमी (संपादक) 08-Feb, 2023, 02:40 PM
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाच्या राजकारणात शीतयुद्ध सुरू झाल्याची प्रचिती येते. मात्र काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘मी काँग्रेस पक्षाचा असून काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे आता थोरात यांचे समाधान कसे करायचे हा मोठा प्रश्न पक्षश्रेष्ठी समोर उभा राहीला आहे. विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची तर थोरात यांची नाराजी कशी दूर करावी? यामुळे काँग्रेस पक्षांची ‘संयमाची परीक्षा’ सुरु झाली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा राजकिय गदारोळ करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत राजकीय मैदान जिंकले. या सर्व घडमोडीत संयम राखलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, तांबे यांनी विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच फैलावर घेत नाराजी व्यक्त केली. पदवीधर निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसने पाठविलेले कोरे एबी फॉर्म चुकीचे असल्याचा गौप्यस्फोट करत यामुळे आपण अपक्ष उमेदवारी केल्याचे सांगितले.
या सर्व घडामोडीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नॉट रिचेबल होते. मात्र आपला भाचा सत्यजित तांबे याच्या विजयानंतर थोरात यांनी आपले मौन सोडत पदवीधर निवडणुकीत खेळलेल्या राजकारणावर टीका करत ‘जाणून बुजून मला भाजपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे’ असा आरोप करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.
यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामाही दिला. दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजुर्न खरगे यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात हे सन 1985 ते 2019 या कालावधीत संगमनेर मतदार संघातून सलग आठवेळा विधानसभा सदस्य म्हणुन निवडून आलेले आहेत. एवढा प्रदीर्घ अनुभव असलेले मोठे नेते आहेत.
नेहमी त्यांच्याकडे संयमी, सुसंस्कृत, राजकीय अभ्यास असलेले लोकप्रिय नेते म्हणुन पाहिले जाते. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या पडत्या काळात काँगे्रस प्रदेशाध्यक्ष म्हणुन पक्ष संघटन वाढवत यशस्वी काम केले. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळातच महाविकास आघाडी स्थापन होवून सर्वात कमी जागा मिळवूनही राज्याच्या सत्तेत काँग्रेस पक्षाला सहभागी होता आले.
आपल्या प्रदीर्घ अशा आमदारकीच्या काळात त्यांनी कृषीमंत्री, पशूसंवर्धन, महसूल मंत्री या विभागाचे यशस्वीपणे काम पाहिले. त्यांच्या संयमाची प्रचिती सर्वदूर आहे. मात्र पदवीधर निवडणुकीदरम्यान झालेल्या हालचालीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या ‘विधीमंडळ नेते’पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकारणात त्यांना संयमाची परिक्षा द्यावी लागली आहे.
राजकीय घडामोडीत भाजपाचे वेट अॅण्ड वॉच
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर भाजपाने तेथे उमेदवार अथवा कोणालाही पाठिंबा दिला नाही. एवढेच नव्हे तर थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपानेही आपली मते सत्यजित तांबे यांना दिल्याने तांबे यांचा विजय सूकर झाला. मात्र विजयानंतर सत्यजित तांबे यांनी आपली अपक्ष भूमिका कायम ठेवत भाजपाच्या अपेक्षावर पाणी फिरवले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोरात यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. सुरुवातीला तांबे व आता थोरात आपल्या गळाला लागतील, अशा अपेक्षावर असलेले भाजपा सध्या वेड अॅण्ड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे.
पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली
पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान मतदार संघ काँग्रेसचा असूनही तेथे अपक्ष म्हणुन सत्यजित तांबे यांनी विजय मिळवत आपण अपक्षच राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान आपणास काँग्रेस पक्षाकडून मिळालेले कोरे एबी फॉर्म हे चुकीचे असल्याने अपक्ष उमेदवारी करावी लागली, असे जाहीर पत्रकार परिषदेत सांगत अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. त्यातच बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली. यासर्व घडामोडीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
Comments