कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात आढळला जळालेला ट्रक । पोलिस तपास सुरू
मिरजगाव । वीरभूमी - 04-Oct, 2020, 12:00 AM
नगर - सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार आज पहाटे प्रवाशी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र ट्रकचा जळून कोळसा झाला.
नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला सदर माल वाहतूक ट्रक जळत होता. मात्र याबाबत मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रासह कर्जत पोलिस स्थानक अनभिज्ञ होते. या गाडीला नंबर प्लेट नसून सरकार असे नाव आहे. तसेच यात काय माल होता? ती कुठे चालली होती? आग कशाने लागली? हा अपघात की घातपात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत वृत्त असे की, नगर सोलापूर मार्गावरील नागलवाडी गावाच्या शिवारात निमगाव गांगर्डासह 17 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी असणार्या रिकाम्या पाण्याच्या टाकी पासून साधारणतः शंभर मीटर अंतरावर मालवाहतूक ट्रक जळालेल्या अवस्थेत आढळली. ही ट्रक जळत असताना तेथे चालक व अजून कोणीच नव्हते. सदर गाडी जळून खाक झाली आहे.
याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता जळीत मालट्रक कशाने जळाला याबाबतचे कारण आणखीन समजले नसून सदर घटनेबाबतची फिर्याद उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती. अद्याप तरी कोणीही फिर्याद दिली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
Comments