पाथर्डी । वीरभूमी - 12-Feb, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे तर उपाध्यक्षपदी रामकिसन काकडे यांची बिनिवरोध निवड करण्यात आली.
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीही बिनविरोध पार पडल्या. आज शुक्रवारी कारखाना संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर सभा आयोजित केली होती.
यावेळी अध्यक्षपदासाठी आप्पासाहेब राजळे यांच्या नावाची सुचना उद्धवराव वाघ यांनी मांडली तर त्यास बाबासाहेब किलबिले यांनी अनुमोदन दिले.
तर उपाध्यक्षपदासाठी रामकिसन काकडे यांच्या नावाची सुचना सुभाष बुधवंत यांनी मांडली तर त्यास सुभाष ताठे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार ससाणे यांनी जाहीर केले.
या निवडीप्रसंगी संचालक आ. मोनिकाताई राजळे, उद्धवराव वाघ, अनिल फलके, साहेबराव सातपुते, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, राहुल राजळे, काकासाहेब शिंदे, सिंधुबाई जायभाये, कुशीनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे यांच्यासह कार्यकारी संचालक जे. आर. पवार, भास्करराव गोरे, आर. बी. शेख, आदिनाथ राजळे, महाजन आदी उपस्थित होते.
कारखाना पदाधिकारी निवडीनंतर राष्ट्रीय साखर कामगार संघटनेच्यावतीने संघटनेचे सरचिटणीस नितिन पवार व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
Comments