अहमदनगर । वीरभूमी- 30-Oct, 2021, 04:52 PM
सप्टेंबर 2021 या महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अहमदनगर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीतून शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तुर्त अहमदनगर जिल्ह्यासाठी 28 कोटी 33 लाख 68 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
हा निधी तालुका प्रशासनाकडे प्राप्त झाला असून पूरबाधित गावांतील नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपुर्वी निधी वितरीत करण्यासाठी याद्या तयार केल्या जात आहेत. यामुळे पूरबाधित शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगाव या सहा तालुक्यातील सुमारे 258 गावांतील 76 हजार 593 बाधित शेतकर्यांना 28 कोटी 33 लाख 68 हजार रुपये निधी वितरीत करण्यात येणार आहे.
यामध्ये सर्वाधिक निधी हा शेवगाव तालुक्यासाठी प्राप्त झाला असून तो 16 कोटी 35 लाख 40 हजार एवढा आहे. त्या खालोखाल पाथर्डी तालुक्यासाठी 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.
तालुका प्रशासनाकडे निधी प्राप्त झाल्यानंतर बाधित शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. वरील सहा तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 45 कोटी 34 लाख 10 हजार 79 रुपये निधीची मागणी राज्य सरकारकडे केली होती. यापैकी 28 कोटी 33 लाख 68 हजार निधी प्राप्त झाला आहे.
तालुकानिहाय बाधित गावांची संख्या, बाधित शेतकरी संख्या व प्राप्त निधी पुढीलप्रमाणे- नगर तालुक्यातील 10 गावांतील 218 शेतकर्यांना 6 लाख 77 हजार रुपये. पाथर्डी तालुक्यातील 114 गावातील 25 हजार 922 शेतकर्यांना 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपये. शेवगाव तालुक्यातील 79 गावांतील 39 हजार 509 शेतकर्यांना 16 कोटी 35 लाख 40 हजार रुपये.
जामखेड तालुक्यातील 3 गावांतील 233 शेतकर्यांना 12 लाख 37 हजार रुपये. श्रीरामपूर तालुक्यातील 16 गावांतील 4 हजार 732 शेतकर्यांना 1 कोटी 73 लाख 68 हजार रुपये. कोपरगाव तालुक्यातील 36 गावांतील 5 हजार 979 शेतकर्यांना 3 कोटी 9 लाख 43 हजार रुपये असे एकुण 28 कोटी 33 लाख 68 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
प्राप्त अनुदान वाटपासाठी पंचनाम्यानुसार बाधित शेतकर्यांच्या याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे पूरबाधित शेतकर्यांना दिवाळीपुर्वी पैसे मिळतील अशी असा अंदाज आहे.
bBdWXHqp